Pages

कानडा राजा पंढरीचा

कानडा राजा पंढरीचा , 
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा

निराकार तो निर्गुण ईश्वर
असा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर
पुतळा चैतन्याचा

कानडा राजा पंढरीचा , 
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा

परब्रम्ह हे भक्तासाठी
उभे ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव
जणु कि पुंडलिकाचा

कानडा राजा पंढरीचा , 
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा
वाली दामाजीचा

कानडा राजा पंढरीचा , 
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा